
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या आणि जलद लोकल तब्बल 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची सर्व स्थानकांत मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. सकाळपासूनच लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत असल्याने पीक अवर्सला नोकरदार मंडळींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने अलीकडेच सिग्नल यंत्रणा अद्ययावत केली आहे. त्या यंत्रणेमुळे लोकल सेवा सुरळीत चालेल असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र प्रत्यक्षात लोकल गाड्यांचे वेळापत्रक वारंवार विस्कळीत होत आहे. बोरिवली ते चर्चगेट दरम्यानच्या मार्गावर लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. अनेक गाड्या अचानक रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धावाधाव करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.
























































