SBI कर्मचाऱ्याने बँकेबाहेर पत्नीवर झाडल्या गोळ्या; घरी जाऊन बहिणीला ठार करत स्वतःही संपवले आयुष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये गुरुवारी दुहेरी हत्याकांड आणि आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने बँकेबाहेर भरदिवसा पत्नीवर गोळ्या झाडल्या, त्यानंतर घरी जाऊन आजारी बहिणीची हत्या केली आणि शेवटी स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.

मानस वाजपेयी असे त्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास मानस लखनौच्या उच्चभ्रू गोमती नगर भागातील आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) शाखेबाहेर पोहोचला. त्याची पत्नी दिव्या मिश्रा याच बँकेत कार्यरत होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मानसने दिव्याला बँकेबाहेर बोलावले, काही मिनिटे तिच्याशी चर्चा केली आणि अचानक तिच्यावर गोळी झाडून तिथून पळ काढला. दिव्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दिव्या आणि मानस यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, गेल्या एका वर्षापासून ते विभक्त राहत होते. दिव्याने गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता.

घरी जाऊन बहिणीचा खून आणि स्वतःवर झाडली गोळी

पत्नीवर हल्ला केल्यानंतर मानस दुपारी १२:३० च्या सुमारास घरी परतला. मानसच्या घराशेजारील एका दुकानदाराने सांगितले की, “तो खूप घाईत होता आणि त्याला प्रचंड घाम आला होता. त्याने घरात जाऊन मोठ्या आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली.” मानसने घरात आधी मानसिकदृष्ट्या आजारी असलेली आपली २८ वर्षीय बहीण शिवा वाजपेयी हिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.

हत्येनंतर व्हॉट्सॲपवर ठेवलेलं धक्कादायक स्टेटस

स्वतःला संपवण्यापूर्वी मानसने व्हॉट्सॲपवर ठेवलेले स्टेटस पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याने स्टेटसला लिहिले होते, “माझ्याशी प्रतारणा करणाऱ्या पत्नीला मी आज ठार केले आहे. आता मला स्वतःला, माझ्या बहिणीला आणि तिच्या बहिणीला संपवायचे आहे.” शेजाऱ्यांनी त्याचे हे व्हॉट्सॲप स्टेटस पाहिल्यानंतर संशय येऊन घरात जाऊन पाहिले असता मानस आणि त्याच्या बहिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.