BCB वर बांगलादेश प्रीमियर लीग रद्द करण्याची वेळ, कोट्यवधींचा फटका अन्… अध्यक्षांनी सांगितलं कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सन 2012 मध्ये सुरू झालेल्या बांगलादेश प्रीमियर लीगला यंदा ब्रेक लागणार आहे. कारण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) मोठा निर्णय घेत यंदाची बांग्लादेश प्रीमियर लीग (BPL) स्पर्धा रद्द केली आहे. या स्पर्धेमुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला नफ्याची अपेक्षा होती. मात्र, गेल्या सलग दोन वर्षात BPL मुळे बोर्डाला तब्बल 31.5 कोटी रुपायांचा फटका बसला आहे. त्यामुळे लीगला अधिक व्यवस्थित आणि नवीन स्वरूपात पुन्हा सुरू केले जाईल, असं बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबाल यांनी सांगितलं आहे.

देशातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळावी म्हणून IPL च्या धर्तीवर BPL ची 2012 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. या लीगचे आतापर्यंत 12 सीजन झाले आहेत. मात्र, स्पर्धेचा इतिहास पाहिला तर गेल्या काही वर्षांमध्ये स्पर्धा विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यंदाच्या मे महिन्यातच अँटी-करप्शन युनिटने एका खेळाडू आणि संघ अधिकाऱ्याला बेटिंगमध्ये सहभागी असल्याबद्दल निलंबित केले होते.

बांगलादेश प्रीमियल लीगच्या इतिहासात डोकावल्यास कोमिला विक्टोरियंस ही स्पर्धा गाजवणारी सर्वात यशस्वी संघ ठरली असून तिने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. तसेच लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम खुद्द बीसीबीचे अध्यक्ष तमीम इकबाल यांच्याच नावावर आहे. बांगलादेश प्रीमियर लीग रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी 2014 मधील राजकीय संकट आणि 2020-21 मधील कोविड महामारीमुळेही स्पर्धा होऊ शकली नव्हती.