
परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता व्हिसा मिळवणे आणि महागडी विमानांची तिकिटे खिश्याला परवडत नाहीत. त्यामुळे परदेशवारीला बाजूला सारून आपल्याच देशातील सुंदर आणि नयनरम्य ठिकाणांना भेट देण्याचा नवा ट्रेंड सध्या सुरू झालाय. मुंबईत सुरू असलेल्या टीटीएफ (TTF 2026) या पर्यटन महोत्सवात तज्ज्ञांनी ही रंजक माहिती दिली आहे.
परदेशात फिरताना व्हिसाच्या समस्या, विमान तिकिटांचे वाढते दर, तसेच अमेरिका आणि युरोपमधील बदलत्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर मोठा परिणाम झाला असल्याचे TAAI च्या वेस्टर्न रिजनचे अध्यक्ष राजेश पोद्दार यांनी म्हटले आहे. यामुळे हिंदुस्थानातील पर्यटक आता देशातच फिरण्यासाठी नवनवीन आणि प्रसिद्ध ठिकाणे शोधत आहेत. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (TAAI) आकडेवारीनुसार, 2025 मध्ये हिंदुस्थानात तब्बल 4.3 अब्जांहून अधिक देशांतर्गत प्रवास झाले तर, याच काळात केवळ 3.28 कोटी नागरिकांनी परदेशवारी केली. यावरून परदेश प्रवासाच्या तुलनेत देशांतर्गत पर्यटनाचा वेग कितीतरी अधिक असल्याचे स्पष्ट होते.
हिंदुस्थानात पर्यटनाची टक्केवारी वाढल्यामागे डेस्टिनेशन वेडिंग आणि कॉर्पोरेट MICE क्षेत्राचाही मोठा हातभार आहे. हिंदुस्थानात होणाऱ्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये 15 ते 20 टक्के तर कॉर्पोरेट क्षेत्रात 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. गोवा, उदयपूर, जयपूर, कोची, वाराणसी आणि इंदूर ही शहरे लग्न आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरत आहेत. आगामी काही वर्षांत या क्षेत्रात दरवर्षी सुमारे 12 ते 14 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पर्यटन वाढीचा स्थानिक व्यवसायांनाही फायदा
या पर्यटन वाढीचा थेट आणि सकारात्मक फायदा स्थानिक व्यवसायांना होत आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे, टॅक्सी, रेस्टॉरंट्स, टूर गाइड, स्थानिक हस्तकला आणि वेडिंग इव्हेंट कंपन्यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे. याशिवाय, अयोध्या आणि वाराणसीसारखी धार्मिक स्थळे देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. थोडक्यात सांगायचे तर, आपल्याच देशात फिरण्यासाठी इतकी अप्रतिम आणि वैविध्यपूर्ण ठिकाणे उपलब्ध आहेत, की आता परदेशात जाण्याची गरजच उरलेली नाही.



























































