साखरेच्या गोडव्याला मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कडवटपणा, खरगे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सणासुदीचा काळ तोंडावर आलेला असतानाच देशात साखरेच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या गोडव्यात मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कडवटपणा आल्याची घणाघाती टीका खरगे यांनी केली आहे.
आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारला तीन थेट प्रश्न विचारले आहेत. हिंदुस्थान हा साखरेचा जगात सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश असताना, आज देशातील साखरेचा साठा नऊ वर्षांतील नीचांकी पातळीवर का पोहोचला आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच साखरेची निर्यात थांबवून तब्बल 10 लाख टन साखर शुल्कमुक्त आयात करण्याची वेळ सरकारवर कशी आली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गेल्या तीन महिन्यांत साखर जवळपास 40 टक्क्यांनी महाग झाली असून सणासुदीच्या काळात जनतेवर लादलेल्या या महागाईच्या दडपणाला कोण जबाबदार आहे? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

देशात निर्माण झालेल्या साखरेच्या कथित तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी सरकारच्या इथेनॉल धोरणावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार परदेशातून साखर आयात करत असताना E20 साठी इथेनॉल निर्मितीकरिता ऊस आणि धान्य वळवण्याच्या धोरणाचा फेरविचार का केला जात नाही, असा सवाल करत हा कसला आत्मनिर्भर भारत?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. आधी साखरेचे उत्पादन घटले, त्यानंतर साखरेचा साठा नऊ वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला. आता परदेशातून साखर आयात करावी लागत आहे आणि दुसरीकडे ऊस पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल उत्पादनाकडे वळवला जात असल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.