
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पीठ, तांदूळ, साखर, तेल यांसह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांच्या घरखर्चाचे बजेट कोलमडले असल्याचा आरोप त्यांनी केला.
जयराम रमेश यांनी शनिवारी ‘एक्स’वर पोस्ट करत महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य नागरिक महागाईच्या कचाट्यात सापडला असून, मध्यमवर्गीय कुटुंबांचे घरगुती बजेट पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे त्यांनी म्हटले.
“साबणापासून मोटारीपर्यंत, मसाल्यांपासून पीठ, तांदूळ, साखर आणि तेलापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनता महागाईच्या जात्यात भरडली जात आहे. उत्पन्न मर्यादित आहे, मात्र स्वयंपाकघराचा खर्च दर महिन्याला वाढत आहे. महागाईचा थेट परिणाम आता सामान्य माणसाच्या ताटावर आणि दैनंदिन खर्चावर होत आहे,” असे रमेश यांनी म्हटले.
महिनाभरात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याचा दावा
गेल्या महिन्यात विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पीठाची किंमत 32 वरून 40 प्रति किलो, तांदळाची किंमत 42 वरून 54 प्रति किलो झाली आहे.
जिऱ्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, तो 180 वरून 380 प्रति किलो झाला आहे. हळदीची किंमत 130 वरून 260 प्रति किलो झाली आहे. मोहरीचे तेल 165 वरून 200 प्रति किलो, तर शेंगदाणा तेल 170 वरून 230 प्रति किलो झाले आहे. रिफाइंड तेलाच्या किमतीतही वाढ झाली असून, ते 130 वरून 190 प्रति किलो झाल्याचा दावा रमेश यांनी केला. साखरेच्या किमतीतही अवघ्या दोन महिन्यांत 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले.
साबण, टूथपेस्टपासून मोटारीपर्यंत दरवाढीचा आरोप
महागाईचा परिणाम केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित नसल्याचेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. साबण, कपडे धुण्याची पावडर, टूथपेस्ट, बिस्किटे यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून टायर आणि मोटारींपर्यंत अनेक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“सामान्य माण्याचे जगणे कठीण झाले आहे. मात्र, अहंकारी आणि उदासीन मोदी सरकार शांतपणे झोपले आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत,” अशी टीका रमेश यांनी केली.

























































