रेवंत रेड्डींना अमेरिकेच्या दौऱ्याची परवानगी नाकारल्यावर खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल; ‘गुंतवणुकीचे प्रयत्न रोखणे संघराज्य व्यवस्थेला घातक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या प्रस्तावित अमेरिका दौऱ्याला केंद्र सरकारने परवानगी नाकारल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकार परदेश दौऱ्यांसाठी राजकीय मंजुरी देताना निवडक पद्धतीने निर्णय घेत असून, राज्यांच्या पातळीवर परदेशी गुंतवणूक आणण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप खरगे यांनी केला.

कलबुर्गी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना खरगे म्हणाले की, मुख्यमंत्री परदेशात केवळ दौरा करण्यासाठी जात नाहीत, तर ते तेथील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधून आपल्या राज्यात परदेशी गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न करतात. या गुंतवणुकीमुळे राज्यात उद्योग उभे राहतात आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे अशा दौऱ्यांना परवानगी नाकारणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

“केंद्र सरकार आपल्या पसंतीच्या व्यक्तींनाच परदेश दौऱ्याची परवानगी देते. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. अमेरिका येथे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय राहतात. त्यांना आपल्या राज्यात गुंतवणूक करायची असेल किंवा उद्योग सुरू करायचे असतील, तर ते स्वाभाविकपणे राज्याच्या नेतृत्वाशी संपर्क साधतात. त्यामुळे मुख्यमंत्री अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांना भेट देऊन गुंतवणुकीच्या संधी शोधतात. अशा प्रकारे परवानगी नाकारणे अन्यायकारक आहे,” असे खरगे म्हणाले.

परदेशी गुंतवणूक एखाद्या राज्यात आली तर त्याचा फायदा केवळ त्या राज्याला नव्हे, तर संपूर्ण देशाला होतो. त्यातून रोजगारनिर्मिती होते. मात्र, केंद्र सरकार या प्रयत्नांना जाणीवपूर्वक अडथळा आणत असून, सर्व गुंतवणूक केवळ केंद्रामार्फतच यावी, अशी मानसिकता असल्याचा आरोप खरगे यांनी केला.

“राज्यांना थेट गुंतवणूकदारांशी संपर्क साधून गुंतवणूक आणण्याची संधी दिली पाहिजे. केंद्र सरकारने अशा प्रयत्नांना रोखणे चुकीचे असून, मी या भूमिकेचा तीव्र निषेध करतो,” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, रेवंत रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजपवर पक्षीय राजकारणाचा आरोप केला होता. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना प्रस्तावित दौरा मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांच्या पदाशी आणि दौऱ्याच्या उद्देशाशी योग्य ठरत नसल्याने त्याला राजकीय मंजुरी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते.

मोदींच्या वक्तव्यावरूनही खरगेंची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आणि जनतेच्या गरजेनुसार धोरणे तयार केली पाहिजेत, देशाने धोरणांनुसार स्वतःला बदलण्याऐवजी धोरणे देशाच्या गरजेनुसार असली पाहिजेत, असे म्हटले होते. या वक्तव्यावरही खरगे यांनी प्रतिक्रिया दिली.

मोदी ज्या गरजाधारित धोरणांची भाषा करत आहेत, त्याचा पाया देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच घातला होता, असा दावा खरगे यांनी केला. आपल्या काळातील गरजा लक्षात घेऊन नेहरू यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उभारले तसेच आयआयटी, आयआयएम आणि देशातील प्रमुख वैद्यकीय संस्थांच्या उभारणीचा पाया घातला, असे त्यांनी सांगितले.

“नेहरूंची दृष्टी मोदींच्या दृष्टीपेक्षा खूप मोठी आणि दूरगामी होती,” असा दावा खरगे यांनी केला.

आपण केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री असताना जर्मनीच्या सहकार्याने गुलबर्गा आणि बंगळुरू येथे कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांच्या माध्यमातून तरुणांची रोजगारक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आल्याचेही खरगे यांनी सांगितले.