
दक्षिण आफ्रिकेमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत माजी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन झोलाणी टेटे याचा मृत्यू झाला आहे. टेटेच्या मृत्यूमुळे दक्षिण आफ्रिकेच्या बॉक्सिंग क्षेत्राची मोठी हाणी झाल्याच बोललं जात आहे. 38 वर्षीय टेटे आपल्या कारमध्ये बसून घराबाहेर गेट उघडण्याची वाट पाहत होता, याच दरम्यान बुरखा घातलेल्या दोन सशस्त्र हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून त्याच्या सोबत कारमध्ये असलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, झोलाणी टेटे दक्षिण आफ्रिकेतील ईस्ट लंडन येथील मडान्त्साने परिसरात वास्तव्याला होता. शुक्रवारी (21/08/2026) टेटे एका 27 वर्षीय महिलेसोबत कारमधून घरी आला होता. घराच्या बाहेर गेट उघडण्याची वाट पाहत होता. याच दरम्यान बुरखा घालून आलेल्या दोघांनी टेटेवर अंधाधुंद गोळिबार केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्राणघातक हल्ल्यात टेटे याच्यासोबत कारमध्ये असलेली महिला देखील गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री गॅटन मॅकेन्झी यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला असून, हा देशाच्या क्रीडा विश्वासाठी एक मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. तसेच, हल्ल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.
झोलणी टेटे याने आपल्या यशस्वी कारकिर्दीत 2007 ते 2008 दरम्यान डब्ल्यूबीएफ (WBF) फ्लायवेट, 2014 मध्ये आयबीएफ (IBF) सुपर-फ्लायवेट आणि 2017 ते 2019 दरम्यान डब्ल्यूबीओ (WBO) बॅन्टमवेट जागतिक विजेतेपद पटकावले होते. विशेष म्हणजे, 2017 मध्ये त्यांनी अवघ्या 11 सेकंदांत सिबोनिसो गोन्याचा पराभव करून जागतिक अजिंक्यपद लढतीत सर्वात जलद बाद फेरीचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला होता.




























































