
केरळची 19 वर्षीय कायद्याचे प्रशिक्षण घेणारी विद्यार्थिनी आणि मॉडेल काजिया लिज मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब पटकावला आहे. जयपूर येथे रविवारी झालेल्या अंतिम फेरीत तिने 52 स्पर्धकांना मागे टाकत हा मान मिळवला. आता नोव्हेंबरमध्ये पोर्तो रिको येथे होणाऱ्या 75 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत काजिया हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. तमिळनाडूच्या वैष्णवी गणेश हिला फर्स्ट रनर-अप, तर गुजरातच्या अनुश्री सातवळेकर हिला सेकंड रनर-अप घोषित करण्यात आले. अनुश्रीने ‘मिस इंटरनॅशनल इंडिया 2026’चा किताबही पटकावला.
काजिया लिज मेजो ही केरळमधील मावेलिक्करा येथील रहिवासी असून सध्या विधी शाखेचे शिक्षण घेत आहे. मॉडेलिंगसोबतच तिला अभिनयाचीही आवड आहे. तिचे बालपण संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे गेले. तिने एमिरेट्स नॅशनल स्कूल, सेंट जोसेफ्स स्कूल आणि अबू धाबी इंडियन स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
विशेष म्हणजे सौंदर्य स्पर्धेच्या क्षेत्रात काजियाचा हा पहिलाच विजय नाही. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी तिने ‘मिस टीन दिवा 2024’ चा किताब जिंकला होता. त्यानंतर ‘मिस टीन इंटरनॅशनल 2025’मध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत तिने फर्स्ट रनर-अपचा मान मिळवला. याच वर्षी तिने ‘मिस युनिव्हर्स केरळ 2026’चा किताब पटकावला. हा किताब जिंकणारी ती केरळमधील सर्वात तरुण विजेती ठरली.
काजियाला नृत्य आणि संगीताचीही विशेष आवड आहे. तिने तब्बल 12 वर्षे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. ती गायनासोबत ड्रम्स आणि व्हायोलिनही वाजवते. वक्तृत्व आणि अभिनयातही तिने आपली कला सादर केली आहे. मल्याळम चित्रपट ‘शायलॉक’मधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’च्या अंतिम फेरीत माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन यांनी परीक्षकांच्या पॅनेलचे नेतृत्व केले. माजी विजेत्या उर्वशी रौतेला आणि सेलिना जेटली यांचाही परीक्षकांमध्ये समावेश होता.



























































