कारच्या धडकेत कर्जतच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; शाळेतून घरी जाताना काळाचा घाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत मुरबाड मार्गावरील भालीवडी येथे भरधाव कारच्या धडकेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आर्या ठोंबरे असे मृत मुलीचे नाव आहे. आज सकाळी शाळेतून घरी जात असताना आर्यावर काळाने घाला घातला.

आर्या ठोंबरे भालीवडी शाळेत शिकत होती. श्रावणी सोमवारमुळे शाळा लवकर सुटल्याने आर्या आपल्या मैत्रिणींसह कुंडलजच्या दिशेने घरी पायी जात होती. यावेळी भरधाव इको कार चालकाने तिला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिच्या मैत्रिणी मात्र थोडक्यात बचावल्या. अपघातानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आर्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेने कुंडलज व भालीवडी परिसरात शोककळा पसरली.

ग्रामस्थांचा पोलीस ठाण्याला घेराव

चिमुकलीच्या मृत्यूने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने कर्जत पोलीस ठाण्यात घेराव घालत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. कर्जत पोलिसांनी बेशिस्त चालक अल्पेश कर्णक याला अटक केली आहे.