
दिवसेंदिवस भाईंदर शहराची लोकसंख्या वाढत असून मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना आग लागल्यास ड्रोनद्वारे ती विझवली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला जाणार असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने याबाबत केलेले प्रात्यक्षिक यशस्वी झाले आहे. ड्रोनमुळे पाण्याचा अचूक मारा करणे शक्य असून आगदेखील जलद गतीने विझण्यास मदत होईल, असा विश्वास अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात उंच इमारतीच्या ठिकाणी आग लागल्यास ती विझवताना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्यक्ष आगीपर्यंत पोहोचणे अतिशय कठीण जाते. मात्र ड्रोनच्या सहाय्याने पाण्याचा मारा केल्यास आग आटोक्यात येणार आहे. त्यामुळे जीवितहानीदेखील टळेल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. उंच इमारतीला लागलेली आग ड्रोनने विझवण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त डॉ. सचिन बांगर आणि मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. प्रकाश बोराडे आदी उपस्थित होते.




























































