
आंध्र प्रदेशमधील काकिनाडा जिल्ह्यात एका महिलेने तिचा दहा वर्षांचा मुलगा व आई वडिलांना घेऊन पुलावरून गोदावरी नदीत उडी मारली. यात महिला व तिच्या पालकांचा मृत्यू झाला तर तिच्या दहा वर्षाच्या मुलाला मच्छीमारांनी वाचवले. या सर्वांना आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी रायफल शूटिंग प्रशिक्षक शेख साधिक खान याला मेरठ येथून अटक केली आहे. साधिक खान हा सदर मुलाच्या शाळेत प्रशिक्षक होता.
ही हृदयद्रावक घटना १७ ऑगस्ट रोजी राजमहेंद्री येथील गोदावरी नदीच्या पुलावर घडली. काकिनाडा येथील पंचायत राज विभागातील सहाय्यक अभियंता तिल्लापुडी नुकाराजू (६१), त्यांची पत्नी मीना (५९), मुलगी सौजन्या (३४) आणि १० वर्षांचा नातू रियांश कार्तिकेय रेड्डी यांनी नदीत उडी घेतली. नुकाराजू, मीना आणि सौजन्या यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर रियांश पुलाच्या ग्रीलमध्ये अडकल्याने स्थानिक मच्छीमारांनी त्याचे प्राण वाचवले.
सौजन्या हिने लिहलेल्या सुसाइड नोटमधून तिने आरोप केला आहे की, शेख साधिक खान याने तिच्या पतीला जगदीश रेड्डीला विष देऊन ठार मारले आणि त्यानंतर तो संपूर्ण कुटुंबाचा छळ करत होता. नुकाराजू यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या इंजिनिअर्स व्हॉट्सॲप ग्रुपवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नावे एक संदेश पाठवला होता. त्यात साधिक खानवर गंभीर आरोप केले आहे. जुलै महिन्यात जावयाच्या निधनानंतर साधिक खानने मदतीचा बहाणा करून कुटुंबाशी जवळीक साधली. त्यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील मौल्यवान वस्तू आणि बँक खात्यांवर ताबा मिळवला. तसेच साधिक खान कुटुंबियांची संपूर्ण संपत्ती हडप करण्याच्या आणि मुलगी व नातवाची हत्या करण्याच्या तयारीत होता, असे सुसाइड नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांचे एक विशेष पथक उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पोहोचले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने २२ ऑगस्ट रोजी नौचंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेख साधिक खानला ताब्यात घेण्यात आले. मेरठ न्यायालयातून ट्रान्झिट वॉरंट मिळवून आरोपीला काकिनाडा येथे आणण्यात आले असून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आर्थिक फसवणूक, धमक्या, जगदीश रेड्डी यांचा मृत्यू आणि कथित धर्मांतराच्या पैलूंची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यासाठी मोबाईल, डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा रेकॉर्ड्स (CDR), वैद्यकीय अहवाल आणि बँक व्यवहारांची सायंटिफिक तपासणी केली जात आहे.



























































