
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील 11 विमानतळांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. नुकत्याच नव्याने विकसित करण्यात आलेल्या वाराणसीतील काशी विमानतळाचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करत असलेल्या वाराणसीतील हे विमानतळ तरी किमान सरकारने स्वतः चालवायला हवे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, सरकारने विमानतळांवर खर्च करायचा आणि मग खासगी कंपन्यांना विकायचे; या कंपन्याही त्यांच्या नातेवाईकांच्याच आहेत, गौतम अदानींच्या आहेत. नवीन नवीन विमानतळे बांधायची आणि खासगी लोकांना ती विकून टाकायची. पब्लिक प्रॉपर्टीचा अशा तऱ्हेने वापर करणे हा देशद्रोह आहे, हे या लोकांना कळत नाही. त्यांना ती राष्ट्रभक्ती वाटतेय. देश विकणे ही त्यांच्यासाठी राष्ट्रभक्ती आहे. कशाकरिता विमानतळे बनवून तुम्ही चालवताय? वाराणसीचे विमानतळ, ज्या भागाचे प्रतिनिधित्व संसदेमध्ये मोदी करतात ते जर तुम्हाला चालवता येत नसेल आणि ते चालवण्यासाठी तुम्ही एखादा बाहेरचा माणूस उद्योगपती म्हणून आणताय, तर हे मोदींचे अपयश असल्याचा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.
…त्यामुळे शिंदे गटाला राजदूत पदे दिली जात आहेत
युती आणि महायुती असतानाही तुमच्या पक्षाच्या वाट्याला राज्यपालपद मिळायचे, लोकसभा अध्यक्षपद मिळायचे. त्या पद्धतीने सध्याच्या महाराष्ट्रातील घटक पक्षांना अजित पवार गट, शिंदे गट राज्यपालपद किंवा केंद्रातील पदांचा लाभ मिळताना दिसत नाही. यावर संजय राऊत म्हणाले की, मला कोणीतरी सांगितले की, त्यांना चार देशांत हाय कमिशनर पद मिळतेय. त्यांना चार देशांमध्ये राज्यपालपद मिळणार नाहीच, पण हाय कमिशनर म्हणून त्यांच्या पक्षाला चार जागा देतायत. मोठा पक्ष आहे, एवढा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे! अगदी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्यापर्यंत त्यांचे वजन आहे. ट्रम्प त्यांना घाबरतो की, आमचाही पक्ष फोडतील म्हणून! त्यामुळे त्यांच्या पक्षाला म्हणजे शिंदे गटाला चार राजदूत पदे दिली जात आहेत. त्यांचे सर्व पैसे परदेशात आहेत ना, त्यामुळे ते पैसे सांभाळण्यासाठी आणि परदेशातील संपत्ती सांभाळण्यासाठी त्यांना राज्यपालपद नको, तर राजदूत पद हवेय. अजित पवार गटाला दोन राजदूत पदे देतील ते. दिल्लीत बसलेली लोक सध्या फार ‘दिलदार’ झालेली आहेत.
अजित पवार गट आणि शिंदे गट हे अमित शहा यांची अंगवस्त्रे
आम्हाला पदे मिळत होती; कारण आम्ही स्वाभिमानाने, ताठ मानेने काम करत होतो. हे गुलाम आहेत, लाचार आहेत. यांचे पक्षच अमित शहा यांनी स्थापन केलेले आहेत. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाकी यांचे जे पक्ष आहेत अजित पवार गट आणि शिंदे गट हे अमित शहा यांचे पक्ष आहेत. ही अमित शहा यांची अंगवस्त्रे आहेत. अंगवस्त्राचा अर्थ कळतो का? तो समजून घ्या. हे पक्ष अमित शहा यांची अंगवस्त्रे आहेत. त्यामुळे ते त्याच पद्धतीने वागणार ना, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
भाजपकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जातोय
राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. भाजपकडून जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींचा अपप्रचार केला जातो, असे माझे मत आहे. मी वारंवार सांगितले आहे. शरद पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, शशिकांतराव शिंदे असतील, रोहित पवार आहेत, हे सर्व त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि हे सर्व ठाम आहेत. माझे अनेकदा त्यांच्याशी बोलणे होते. परवाच जयंत पाटलांशी माझे बोलणे झाले. सुप्रियाताई आणि पवार साहेबांशी आमचे बोलणे होतच असते. ते आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. कोणीही कुठे जात नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शहा यांचा नाही, तो वेगळा आहे. हे महाविकास आघाडीतील महत्त्वाचे घटक आहेत. आम्ही एकत्र काम करतो आणि यापुढेही एकत्र करत राहू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मोर्चा सगळ्यात आधी सरकारचे प्रतिनिधी असलेल्यांच्या घरांवर गेला पाहिजे
कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत मोर्चा काढतेय. त्यावर संजय राऊत म्हणाले की, जर त्यांचा अपेक्षाभंग झाला असेल किंवा फसवणूक झाली असेल, तर नक्कीच तरुणांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. सरकारच्या वतीने कॉक्रोच जनता पार्टीशी त्यांच्या मागण्यांसंदर्भात ज्यांनी चर्चा केली होती, त्यांना जाब विचारला पाहिजे. हा मोर्चा सगळ्यात आधी सरकारचे प्रतिनिधी असलेल्यांच्या घरांवर गेला पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आरएसएसला जागतिक स्तरावर विरोध का होतोय याचे आत्मचिंतन करावे
मोहन भागवत यांचा अमेरिका आणि ब्राझील दौरा आहे, त्याला विरोध केला जात आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, त्याच्यावर सरकारने भूमिका घेतली पाहिजे. एका बाजूला तुम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला क्लिअरन्स देत नाही. आता पुढे काय झाले माहीत नाही, तर त्याच वेळी मोहनराव भागवत यांना क्लिअरन्स देतायत. आता मोहनराव भागवत यांना कोण विरोध करतेय हा त्यांचा प्रश्न आहे, ते उत्तर देतील. भाजपच्या लोकांनी उत्तर द्यावे आणि का विरोध होतोय याचे आत्मचिंतन करावे. आरएसएसला जागतिक स्तरावर विरोध का होतोय? असा त्यांनी या देशामध्ये काय काम केले, काय पाप केले, कोणता गुन्हा केला, ज्याच्यामुळे इतक्या सज्जन व्यक्तीला विरोध होतोय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. पुढे ते म्हणाले, भाजप चंद्रावर, मंगळावर सर्वत्र विस्तार करू शकतात. त्यांच्या विस्ताराला मर्यादा नाही. हिंदुस्थानात त्यांच्या ओव्हरसीज बँका आहेत. आरएसएस हिंदुस्थानात नोंदणीकृत संस्था नाही, पण परदेशात आहे. आता मोदीजी चंद्रावर आणि मंगळावर यान सोडतायत, त्या यानात बसवून महाराष्ट्राचे प्रचारक ते वर पाठवतील, त्याला काय झाले!, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.
आता मोदी आणि शहा सांगतील की चहा पिऊ नका
साखर महागली आहे…यावर संजय राऊत म्हणाले की, मग आता मोदी आणि शहा सांगतील की चहा पिऊ नका. ते काहीही करू शकतात. ‘चहा सोडा, चहा हे गुलामीचे लक्षण आहे’ असे सांगतील. चहा पिणे हा देशद्रोह असल्याचे सांगतील. संसदेतही लवकरच चहा बंद करतील. चहा प्यायचा नाही, तो देशद्रोह आहे हे ते करू शकतात. चहा महागला, चहा पिऊ नका. आम्ही रात्रीचे काय प्यायचे ते पिऊ, पण जनतेने चहा प्यायचा नाही, अशा प्रकारचा एखादा अध्यादेशही येऊ शकतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली.



























































