
टीम इंडिया श्रीलंकेतील कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करत आहे. पण तरीही टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचेल का, याबाबत संभ्रम आहे. पण माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मात्र आशा वाटत आहे. द्रविड म्हणाले की, ‘मला आशा आहे की टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचेल. येथून हिंदुस्थानने डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास खूप छान होईल. हिंदुस्थान थोडा मागे आहे, पण त्यांच्याकडे ज्या प्रकारचे खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही कधीही कमी लेखू शकत नाही. श्रीलंकेविरुद्ध त्यांची सुरुवात चांगली झाली, त्यामुळे हे एक चांगले पहिले पाऊल आहे. पण त्यानंतर न्यूझीलंडमध्ये खेळणे आव्हानात्मक असणार आहे. तो एक मजबूत संघ आहे. अनेक तरुण खेळाडू तेथील परिस्थितीशी अपरिचित आहेत, त्यामुळे त्यांना तिथे मोठय़ा आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. आम्हाला विराट, रोहित, रहाणे आणि पुजारा यांसारख्या खेळाडूंची उणीव भासेल. हे सर्व खेळाडू हिंदुस्थानच्या न्यूझीलंडच्या शेवटच्या दौऱयात उपस्थित होते. तरुण खेळाडूंच्या दृष्टिकोनातून ही एक रोमांचक मालिका असेल.’
























































