
पुरणपोळीचा घमघमाट, उकडीच्या मोदकाची गोडी, गरमागरम वरण-भात आणि त्यावर साजूक तुपाची धार… श्रावणातील पारंपरिक स्वादाची पर्वणी आज लोअर परळच्या नीलगंगा सोसायटीत अनुभवायला मिळाली. लोअर परळ येथील महिलांनी एकत्र येत ‘श्रावण थाळी – सोहळा संस्कृतीचा, सोहळा तृप्तीचा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी, तमिळ महिलांनीही एकत्र येत ही पारंपरिक ‘श्रावण थाळी’ साकारली. एका जपानी महिलेनेही या सोहळ्यात सहभाग घेतला.
हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व असून सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढावा या भावनेतून श्रावण थाळी हा उपक्रम राबवण्यात आला. श्रावण थाळीत तब्बल १९ व्यंजने तयार करण्यात आली होती. सर्वधर्मीय नोकरदार महिलांनी एकत्रित येऊन आपापल्या संस्कृती व परंपरेनुसार एक-एक पदार्थ तयार करून आपला सहभाग नोंदवला. केळीच्या पानावर सजवलेल्या या थाळीत लोणचे, पापड, कुरडया, चटणी, कोशिंबीरसह उकडीचे मोदक, पुरणपोळी, पुरी-भाजी, वरण-भात, अळूचे फतफते, अळूवडी, वालाचे बिर्डे, साऊथ इंडियन रस्सम, पायरम (खीर) आणि पानाचा विडा असे विविध पदार्थ सजवले होते. श्रावण थाळी सजल्यानंतर महिलांनी श्रावण पाळणा, उखाणे आणि फुगडीसारखे पारंपरिक खेळ खेळून आनंद साजरा केला.
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी महिलांना विशेष सहकार्य केले. या उपक्रमात सोसायटीतील संपदा शिंदे, नेहा करलकर, स्मिता पवार, शिल्पा राणे, ज्योती खामकर, नेहा सावंत, निधी सावंत, प्रेरणा कदम, राजश्री मुरुडकर, राखी मालवणकर, पूजा सावंत, नीता गांधी, लया कोकूला, वसुधा बाईत, शांता गुंडेती, सुजाता जिंदम, जानकी अनमराज, रोहिणी चिप्पा आणि नचिको मोरी यांनी सहभाग घेतला होता.






























































