
‘मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मोक्याच्या जागेवरील मालमत्ता बिल्डरांच्या घशात घालण्याच्या ‘महायुती सरकार’च्या धोरणाविरुद्ध कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. बेस्टच्या मालमत्ता विकूच देणार नाही, असा पवित्रा घेत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
बेस्ट कामगारांच्या ११ संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना पत्र लिहिले आहे. बेस्टच्या मालमत्तांची विक्री करण्याच्या निर्णयाला कृती समितीने कडाडून विरोध केला आहे. बेस्ट समिती आणि मुंबई महापालिकेने बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती आणि त्यात समाविष्ट असलेल्या कामगार संघटनांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता मालमत्ता विक्रीचा ठराव मंजूर केला आहे. पालिकेत चक्क रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी ठराव मंजूर करून सरकारी निर्णयाच्या मुख्य गाभ्यालाच हरताळ फासला आहे, असा दावा कृती समितीने केला आहे. मालमत्ता विकण्याच्या निर्णयाविरोधात बेस्ट कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक निर्माण होऊन त्याची परिणिती तीव्र आंदोलनामध्ये झाल्यास त्याला बेस्ट प्रशासन, बेस्ट समिती आणि मुंबई महापालिका जबाबदार असेल, असा इशारा कृती समितीने दिला आहे.




























































