भाजप आमदाराच्या मुलीने महिला पीएसआयच्या कानशिलात लगावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील एका मंदिरात भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांच्या मुलीने बाजूला उभ्या असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली. श्रीरंगपट्टण येथील आरती उक्काता मंदिरात घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आल्याने पोलिसाला मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

महिला पोलिसाच्या कानशिलात लगावणाऱया महिलेचे नाव ऐश्वर्या असे असून ती आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी आहे. तर पीएसआय सविता बी. पाटील असे महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ऐश्वर्या आणि पाटील यांच्यात झालेल्या वादाची ही दृश्ये फुटेजमध्ये दिसत आहेत. या वादादरम्यान ऐश्वर्या मोबाईलवर बोलताना आणि कॉल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि त्यानंतर तिने पाटील यांच्या कानशिलात लगावल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पाटील यांनीदेखील प्रत्युत्तर दिल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

एकमेकांविरोधात तक्रार दाखल

दोघींमधील वाद वाढला आणि ऐश्वर्याने पोलीस अधिकारी पाटील यांना शिवीगाळ करत कानशिलात मारल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सविता यांनी क्येथनाहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार विविध कलमांखाली ऐश्वर्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस अधिकाऱयाने शिवीगाळ केल्याचा आरोप करत ऐश्वर्यानेही प्रतितक्रार दाखल केली आहे.