
जळगाव जिल्हा कृषी निविष्ठांच्या अनधिकृत विक्रीविरोधात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत गुजरातमधील सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल्स कंपनीशी संबंधित गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल्सचे प्रतिनिधी जयेश पटेल, विनोद एन. रणपुरिया तसेच कंपनीचे सर्व संचालक आणि भागीदार यांचा संशयित म्हणून उल्लेख आहे. कंपनीचा पत्ता गुजरातमधील भरूच येथील जीआयडीसी परिसरातील असल्याचे नमूद आहे. या प्रकरणात रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, कीटकनाशक अधिनियम, कीटकनाशक नियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































