
लैंगिक शोषणाच्या प्रकरणात तुरुंगवास भोगणारा बाबा राम रहिम हा पुन्हा तुरुंगाबाहेर आला आहे. रक्षाबंधन दोन दिवसांवर आले असताना राम रहिमला २१ दिवसांची फर्लो मंजूर झाली. फर्लो मंजूर होताच तो रोहतक कारागृहातून बाहेर आला असून सध्या त्याचा मुक्काम सिरसा डेऱ्यात आहे.
२०१७ मध्ये दोन महिला शिष्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम याला पंचकुला न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. नऊ वर्षांच्या काळात राम रहिमला तब्बल १७ वेळा पॅरोल किंवा फर्लो रजा मंजूर करण्यात आली. पंजाबात कोणतीही निवडणूक असो, राम रहिमचा पॅरोल ठरलेला! मंगळवारी राम रहिमला २१ दिवसांची फर्लो मंजूर करण्यात आली. फर्लो मंजूर होताच सकाळी ६ वाजताच राम रहिम सुनारिया कारागृहातून बाहेर आला.
कैद्याने शिक्षेचा काही कालावधी पूर्ण केला असेल तर त्याला पॅरोल मिळू शकतो. पॅरोल हा नियमित आणि कोठडी अशा दोन स्वरूपाचा असतो. फर्लो हा कैद्याचा कायदेशीर अधिकार आहे. प्रत्येक राज्याचे फर्लो मंजूर करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. फर्लोसाठी कोणत्याही विशेष अटीची आवश्यकता नसते.






























































