पुणे, नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे, नागपूर, नाशिक, नांदेडसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द झाली असली तरी, अन्य मागण्यांवर विद्यार्थी ठाम असून त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात उपोषणाला बसलेल्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले असून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आदिवासी वसतिगृहातील प्रवेशाची 30 वर्षे वयाची अट रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या वेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणल्या. राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ सोडवण्याची आग्रही मागणी केली. राहुल यांच्या या पत्रानंतर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

रस्त्यावर उतरावे लागेल – हर्षवर्धन सपकाळ

आदिवासी विद्यार्थ्यांचे 13 दिवसांपासून उपोषण सुरू असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर साधी चर्चा झाली नाही. महायुती सरकार हे आदिवासीविरोधी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.