
प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील आमदारांच्या कारभाराचे प्रगती पुस्तक मांडणारा सर्वेक्षण अहवाल आज जारी केला. यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे आमदार सरस ठरले आहेत. आमदारांच्या कामानुसार त्यांची क्रमवारी या अहवालात ठरवली गेली आहे. त्यात पहिल्या पाच क्रमांकावर काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी बाजी मारली आहे.
हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 दरम्यान मुंबईतील 33 आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हा अहवाल तयार केला आहे. प्रथम क्रमांकावर अमीन पटेल (82.89%), द्वितीय क्रमांकावर अस्लम शेख (80.58%) आणि तृतीय क्रमांकावर ज्योती गायकवाड (80.30%) आहेत. शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू (78.72%) चौथ्या, तर मनोज जामसुतकर (74.24 टक्के) या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहेत.
प्रभू सलग बारा वर्षे पहिल्या पाच आमदारांमध्ये
मतदारसंघातील उत्कृष्ट कामे आणि सभागृहातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच आमदारांमध्ये सलग 12 वर्षे स्थान मिळवण्याचा मान सुनील प्रभू यांना मिळाला आहे. दिंडोशी मतदारसंघात केलेल्या भरीव विकासकामांनाच ही पोचपावती मिळाली आहे.
विधानसभा अध्यक्ष क्रमवारीतही नाहीत
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आशीष शेलार या भाजपच्या तीन आमदारांचा क्रमवारीत समावेश नाही. एकनाथ शिंदे गटाचीही पुरती पीछेहाट दिसून येत आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी सुमार कामगिरी करत क्रमवारीत 22व्या क्रमांकापासून खाली सरकत अगदी शेवटचे टोक गाठले आहे.



























































