
शिंदे गटातील अणुशक्तीनगरचे माजी आमदार तुकाराम काते यांच्या संस्थेतील शिक्षकाला तब्बल 23 महिने पगारच मिळाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संस्थेत सहा महिने चकरा मारणारा शिक्षक सहकाऱ्यांसोबत संस्थेकडे ‘दे दे पगार दे, पगार दे, पगार दे रे… अब तो हमरा पगार दे, जलदी पगार दे रे’ असे उद्वेगाने गाणे गात नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, याला लाखो व्ह्जयू मिळाले आहेत. यातच रखडलेला पगार मागितला म्हणून तुकाराम काते यांनी संबंधित शिक्षकाला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची संतापजनक ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल झाली आहे.
अणुशक्तीनगरचे माजी आमदार तुकाराम काते यांच्या संस्थेत संबंधित शिक्षक इंग्रजी माध्यमामध्ये आठवी, नववी आणि दहावी इयत्तेत विद्यार्थ्यांना शिकवत होता. मात्र या शिक्षकाला तब्बल 23 महिन्यांचा पगार संस्थेने दिला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शिक्षकाने संस्थेमध्ये वारंवार चकरा मारून पगार देण्याची विनंती केली. मात्र संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकी देत घालवून दिल्याचे शिक्षकाचे म्हणणे आहे. तुकाराम काते मात्र ‘तुला शाळेत बोलवले असता आला का नाही’ म्हणून शिक्षकावरच राग काढत असल्याचे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये रेकॉर्ड झाले आहे.
माझी तक्रार पंतप्रधानांकडे कर!
ऑडिओ क्लिपनुसार संबंधित विनोद पोफळे नावाचा शिक्षक आपला पगार रखडल्याचे सांगण्यासाठी कॉल करतो. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात. पगारासाठी सहा महिने संस्थेत चकरा मारत असल्याचे सांगतो. मात्र त्याचे कोणतेही म्हणणे न ऐकता, तुकाराम काते त्याला थेट ‘माझी तक्रार पंतप्रधानांकडे कर. तुला कुठे जायचे तिकडे जा’ अशी धमकी देतात. ‘कधी आलास रे गाढवा. बारा गावांमध्ये फिरतो, … नालायकगिरी करतो. मला सगळय़ांचे फोन येतात’ असे सांगत, ‘मला परत पह्न केल्यास तुला बरोबर करतो’ अशी धमकी देत आहेत.



























































