
बेकायदा गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करत धुमाकूळ घालणारा बोगस डॉक्टर व टोळीप्रमुख स्वप्नील केरबा पाटील (एस.पी.) या 11 जणांच्या टोळीवर अखेर मोक्का लावण्यात आला आहे. राज्यात ही प्रथमच मोक्का कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या मोक्का प्रस्तावाला मंजुरी दिली.
टोळीप्रमुख, बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील (वय 35, रा. जयभवानी तरुण मंडळाजवळ बालिंगा), श्रीमंत तानाजी पाटील (वय 37, रा. परिते), ओंकार गोरखनाथ कराळे (वय 30, रा. सडोली खालसा), अनिल प्रकाश टिपुगडे (वय 40, रा. भोगावती कारखाना कॉलनी, भोगावती. मूळ रा. टिपुगडे गल्ली, दडपेवाडी शिरगांव), महेश सुबराव पाटील (वय 35), दत्तात्रय कृष्णात पाटील, सुनील प्रकाश पाटील (वय 38, तिघेही रा. सिरसे), अश्विनी गजानन शिंदे (वय 38, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), विजय लक्ष्मण कोळसकर (वय 39, रा. मडीलगे खुर्द, ता. भुदरगड), शिवप्रसाद सत्याप्पा महादेव पाटील (वय 40, रा. शिवगंगा अपार्टमेंट, इचलकरंजी), प्रशांत वसंत जाधव (रा. वैभवनगर, जि. बेळगाव) अशा 11 जणांवर ही कारवाई करण्यात आली. गेल्या 10 वर्षांत या सर्वांवर करवीर, राधानगरी, भुदरगड, जुना राजवाडा आदी पोलीस ठाण्यात 11 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व वैद्यकीय तालुका अधिकारी यांच्या पथकाने भोगावती सहकारी साखर कारखाना, शाहुनगर परिते येथील ब्लॉक 5 रूम 4 येथे सापळा रचून केलेल्या कारवाईबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी यांनी फिर्याद दिली आहे.
या गुह्यातील संशयित आरोपींनी कोणतीही वैद्यकीय पदवी वा शिक्षण नसताना जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले होते.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गांभीर्याने दखल घेऊन करवीर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.






























































