आम्हाला भेटवस्तू नकोत, फक्त शाळेची स्थिती सुधारा; रक्षाबंधननिमित्त विद्यार्थ्यांची अनोखी मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रक्षाबंधनच्या निमित्ताने धनबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांनी एक अनोखी मागणी केली. त्यामुळे सर्वांचेच मन हेलावले. शासकीय शाळेतील मुलींनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधली. राखी बांधल्यानंतर विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला आणि आपल्या शाळेसंबंधित समस्या परखडपणे मांडल्या.

एका विद्यार्थ्याने शाळेच्या जीर्ण इमारतीबद्दल, तर दुसऱ्याने मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल तक्रार केली. त्याचवेळी, काही विद्यार्थ्यांनी वाटेत समाजकंटकांकडून होणाऱ्या छळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आपल्या सुरक्षेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि या समस्यांवर जलदगतीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना भेटवस्तू नको आहेत; फक्त त्यांच्या शाळेशी समस्या सोडवल्या जाव्यात,अशी मागणी त्यांनी केली.