MPSC पेपरफुटी प्रकरण – अध्यक्ष, सचिवांच्या राजीनाम्याची मागणी; रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही महाराष्ट्रातील घटनात्मक संस्था असून राज्यातील नागरिकांना सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पदांवर योग्य व्यक्तींची निवड करण्याची जबाबदारी आयोगावर आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा संपूर्ण प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला.

रोहित पवार म्हणाले की, १९९७ मध्ये भाजप सरकारच्या काळात पहिल्यांदा MPSCची प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना घडली होती. त्यावेळी या प्रकरणातील मुख्य व्यक्तीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. आता सुमारे ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा FDA ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.

याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागातील अंतर्गत परीक्षेच्या गुणांकन पद्धतीची माहितीही आधीच फुटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या प्रकारांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी आता संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

“गेल्या महिनाभरापासून आम्ही हा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहोत. ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेतील गैरप्रकाराची योग्य चौकशी व्हावी, यासाठी आम्ही अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे मागणी केली,” असे रोहित पवार यांनी सांगितले.

सुरुवातीला सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून “तुमच्याकडे पुरावे नाहीत” असे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर आपण संबंधित पुरावे दिले. आता MPSCनेही पेपरफुटी झाल्याचे मान्य केले आहे, असे रोहित पवार म्हणाले.

या पार्श्वभूमीवर MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती समोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. यासाठी नेमके कोण जबाबदार आहेत, त्यांची माहिती समोर आली पाहिजे. MPSCच्या अध्यक्षपदी चांगली प्रतिमा आणि विश्वासार्हता असलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली पाहिजे,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.