
ट्रम्प प्रशासनाने स्थलांतराच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत असतानाच जगभरातील व्हिसा अर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये व्हिसा सेवांशी संबंधित अपॉइंटमेंट्स तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करून त्या पुन्हा नियोजित केल्या जात आहेत. त्यामुळे अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी मुलाखतीची वेळ निश्चित केलेल्या हजारो अर्जदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये जागतिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे काही व्हिसा अपॉइंटमेंट्सचे वेळापत्रक बदलण्यात येत आहे. ज्या अर्जदारांच्या अपॉइंटमेंट्स बदलण्यात आल्या आहेत, त्यांना नंतर नव्या तारखेबाबत माहिती दिली जाईल.
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या प्रशिक्षणाचा उद्देश कॉन्सुलर अधिकाऱ्यांना व्हिसा अर्जदारांचे अधिक सातत्याने आणि काटेकोरपणे मूल्यांकन करता यावे, असल्याचे सांगितले आहे. विशेषतः अमेरिकन सरकारच्या सुविधांवर भविष्यात अवलंबून राहण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांना ओळखण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेतील स्थलांतर धोरण अधिक कठोर करण्यास सुरुवात केली आहे. व्हिसा, ग्रीन कार्ड आणि स्थलांतरितांच्या प्रवेशासंदर्भात प्रशासनाकडून विविध पावले उचलली जात आहेत. राजकीय भूमिका, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दे तसेच पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांमध्ये सहभाग अशा विविध कारणांवरून काही व्यक्तींवर व्हिसा किंवा स्थलांतराशी संबंधित कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या काही स्थलांतरविषयक निर्णयांना न्यायालयीन आव्हानही मिळत आहे. नुकतेच एका अमेरिकी न्यायाधीशांनी 75 देशांतील नागरिकांना स्थलांतरित व्हिसा देण्यावर निर्बंध आणणारे प्रशासनाचे धोरण रद्द केले. हे धोरण परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या कायदेशीर अधिकारक्षेत्राच्या पलीकडे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
‘फायनान्शिअल टाइम्स’च्या अहवालानुसार, अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये इमिग्रंट व्हिसासाठी मुलाखतीची अपॉइंटमेंट घेतलेल्या काही अर्जदारांना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यांची आधीची अपॉइंटमेंट पुन्हा नियोजित केली जात असून नवीन तारीख नंतर कळवण्यात येईल, असे या ई-मेलमध्ये सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.



























































