
तिबेटमधून आलेल्या पुराचा नेपाळला फटका बसला आहे. भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांत हाहाकार उडाला आहे. यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 105 हिंदुस्थानींसह 384 पर्यटक बेपत्ता झाले आहेत. सीमावर्ती तिबेट भागातून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नेपाळमधील अनेक गावे वाहून गेली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नेपाळमधील अनेक महामार्गही बंद करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागातून किमान 384 पर्यटक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. बेपत्ता झालेल्या पर्यटकांमध्ये 291 परदेशी आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. बेपत्ता परदेशी नागरिकांपैकी 105 जण हिंदुस्थानी आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतून किमान आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 25 जणांची सुटका करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यात नेपाळ पोलिसांचे किमान 26 जवान आणि सशस्त्र पोलीस दलाचे सात जवान बेपत्ता आहेत.
पुरामुळे नेपाळमधील किमान सहा प्रमुख जलविद्युत आणि पारेषण (ट्रान्समिशन) प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. परिणामी वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामध्ये रसुवागढी, चिलिमे, त्रिशुली 3ए, त्रिशुली 3बी हब 220 केव्ही सबस्टेशन, त्रिशुली जलविद्युत केंद्र आणि देवीघाट जलविद्युत केंद्र यांचा समावेश आहे.






























































