
साखरेचे अतिरिक्त सेवन धोकादायक आहे आणि अचानक सोडणेही कठीण आहे, पण असे का होते, हे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.तसेच अचानक साखर सोडण्याचे तोटे असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
अनेक लोकांना गोड पदार्थ खाण्याची आवड असते. त्यांना हे पदार्थ एवढे आवडतात की, त्यांची इच्छा असूनही ते गोड पदार्थ खाणे थांबवू शकत नाहीत. जर काही लोकांनी साखरेचे पदार्थ खाणे अचानक सोडले, तरी त्यांना त्यांच्या शरीरात विविध समस्या जाणवतात. कोणत्याही स्वरूपात साखरेचे अतिरिक्त सेवन धोकादायक आहे आणि अचानक सोडणे कठीण आहे. साखर खाणे सोडायचे असेल तर काय केले पाहिजे, याबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे.
तज्ज्ञांच्या मते साखरेचे व्यसन लागत नाही, परंतु या तीव्र इच्छेमागे आणि ती सोडता न येण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती साखर खाते, तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन वेगाने वाढते. यामुळे त्यांना बरे वाटते. साखरेच्या वारंवार सेवनामुळे मेंदूला त्याच सुखद अनुभवाची सवय होते.
साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी त्वरित वाढते, त्यानंतर ती वेगाने कमी होते, त्यामुळे शरीराला पुन्हा गोड खाण्याची तीव्र इच्छा होते.डायबिटीस झाल्यावर काहीजण अचानक साखर बंद करतात, मात्र, ते धोकादायक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अचानक साखर पूर्णपणे बंद करणे हे योग्य नाही. असे केल्यास व्यक्तीला तीव्र डोकेदुखी आणि थकवा, मनःस्थितीत बदल आणि चिडचिड जाणवते. हे शरीरातील डोपामाइनच्या पातळीत घट झाल्यामुळे आणि रोजच्या साखरेच्या प्रमाणात होणारी वाढ कमी झाल्यामुळे होते.
असे परिणाम टाळण्यासाठी साखर कधीही अचानक सोडू नका, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. साखर अचानक सोडण्यापेक्षा तिचे सेवन हळूहळू कमी करा. आठवड्याला १० ते १५ टक्के कपात करणे ठीक आहे. जर दिवसातून दोनदा साखरेचा चहा पीत असाल, तर ते प्रमाण कमी करून फक्त एकदाच करा. जर तुम्ही रोज गोड खात असाल, तर त्याऐवजी आंबे किंवा केळ्यांसारखी गोड फळे खा आणि मग हळूहळू सफरचंद आणि पेरू यांसारखी फळे खायला सुरुवात करा. असे केल्याने तुम्हाला हळूहळू साखर सोडण्यास मदत होईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.






























































