
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून, त्याचा परिणाम बिहारवर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बिहार प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. बेतिया, मोतिहारी, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशालीसह संवेदनशील जिल्ह्यांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. या बैठकीला संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला.
गंडक नदीच्या पाणलोट क्षेत्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नदीची पाणीपातळी, बंधारे, सखल भाग, पूल आणि इतर संवेदनशील ठिकाणांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती गंभीर झाल्यास स्थानिक नागरिकांना तातडीने सतर्क करण्यासही सांगण्यात आले आहे. सीतामढी आणि शिवहरसह इतर संवेदनशील जिल्ह्यांनाही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार नेपाळमधील रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा, लमजुंग आणि तनहुन या गंडक पाणलोट क्षेत्रातील भागांमध्ये अचानक पूर येण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दोलखा आणि सिंधुपालचोक या कोसी पाणलोट क्षेत्रातील भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोसी, बागमती आणि गंडक पाणलोट क्षेत्रातील अन्य भागांमध्येही मध्यम स्वरूपाचा पूरधोका असल्याचे सांगण्यात आले आहे. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफीची पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जलसंपदा विभागाला गंडक बॅरेज आणि त्याच्याशी संबंधित कालव्यांच्या संचालनाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना सामुदायिक स्वयंपाकघरे, निवारा केंद्रे आणि पुरेशा बोटींची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. गरज भासल्यास अतिरिक्त एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके, बोटी तसेच अन्य आवश्यक संसाधने तातडीने तैनात केली जाणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज माध्यमांना परिस्थितीची माहिती द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




























































