
कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या वंशावळ जुळवणी समित्यांना राज्य शासनाने आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रलंबित वंशावळ जुळवणीची प्रकरणे पूर्ण करण्यासाठी समित्यांना आता 30 जून 2027 पर्यंत काम करता येणार आहे. कुणबी अथवा मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये वंशावळ जुळवणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण करण्यासाठीच समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी वंशावळ जुळवणीची प्रक्रिया तालुकास्तरावर केली जाते. त्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना यापूर्वी देण्यात आलेली मुदत 30 जून 2026 रोजी संपली होती. ज्या व्यक्तींच्या जुन्या शासकीय नोंदी, महसूल कागदपत्रे किंवा इतर पुराव्यांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी अथवा कुणबी-मराठा असा उल्लेख आढळतो, त्यांच्यासाठी वंशावळ जुळवणीची प्रक्रिया महत्त्वाची ठरते. संबंधित कागदपत्रांमधील नातेसंबंध आणि वंशावळ यांची पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रमाणपत्र प्रक्रियेला मार्ग मोकळा होतो. मात्र अनेक ठिकाणी त्याअभावी प्रकरणे प्रलंबित आहेत.


























































