अनाया पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार! ऑस्ट्रेलियाने दिली खेळण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये तिने लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून सर्वांना धक्का दिला होता. तेव्हापासून ती क्रिकेट विश्वापासून दूर होती. मात्र, किक्रेट विषयीची जिद्द तिला पुन्हा तिच्या स्वप्नांकडे घेऊन आली आहे. लहानपणापासून क्रिकेटप्रेमी असलेल्या अनायाला पुन्हा आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून ती आता ऑस्ट्रेलियामध्ये खेळणार आहे.

अनाया बांगरला लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ऑस्ट्रेलियातील महिला कम्युनिटी क्रिकेट खेळण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मार्च 2027 पर्यंत अनाया ऑस्ट्रेलियातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रीमियर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास पात्र असेल. अनायाने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आनंद व्यक्त केला आहे. माझ्यासाठी हा क्षण खूप आनंदाचा असल्याचे अनाया म्हणाली. मला पुन्हा क्रिकेट खेळण्याची संधी मिळतेय हे समजल्यावर खूपच आनंद झाला. मी पुन्हा परत कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही, असंच मला नेहमी वाटायचं. मात्र, तिला पुन्हा एक संधी दिल्याबद्दल अनायाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले आहेत.

गेल्या वर्षी अनायाने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची इच्छा दाखवली होती. यासाठी तिने ट्रान्सजेंडर खेळाडूंसाठी असलेल्या पात्रता निकषांबाबत माहिती घेण्यासाठी BCCI ला पत्र लिहिलं होतं. मात्र, कोणताही प्रतिसाद न आल्याने तिने थेट क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

ऑस्ट्रेलियाने अनायाला दिलेल्या उत्तरात म्हटले की, ती तातडीने कम्युनिटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करू शकते. मात्र, वुमन्स बिग बॅश लीग सारख्या ‘एलिट क्रिकेट’मध्ये खेळण्यासाठी तिला टेस्टोस्टेरॉनशी संबंधित पात्रता निकष पूर्ण करावे लागतील. त्यांच्या पॉलिसीनुसार, एलिट क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी खेळाडूच्या रक्तातील सीरम टेस्टोस्टेरॉनची पातळी किमान १२ महिने १० nmol/L पेक्षा कमी असणं आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी विभागाच्या प्रमुख जॅकी पॅट्रिज यांच्या म्हणण्यानुसार, मार्च २०२७ पर्यंत अनाया ऑस्ट्रेलियातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रीमियर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यास पात्र असेल.