
गोरक्षणाच्या नावाखाली गाडी चालकाच्या तोंडात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शेण कोंबल्याची घृणास्पद घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
जालना पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार २३ मे २०२६ रोजी परमेश्वर हिवाळे हे त्यांचा मुलगा सम्मेक आणि नारायण मारोती कांबळे यांच्यासोबत देऊळगावराजा येथे गेले होते. नारायण कांबळे यांनी बाजारातून सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून एक बैल खरेदी केला. बैलाला टेम्पोतून जालना येथे आणण्यात येत असताना दुपारी ३.३० वाजता कन्हैयानगर टी पॉइंटजवळ मोटारसायकलवर आलेल्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. ‘आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते असून गोरक्षक आहोत’ असे म्हणत त्यांनी परमेश्वर हिवाळे यांना शिवीगाळ केली.
मारहाण केली, शिव्या दिल्या गाडी अडवल्यानंतर परमेश्वर हिवाळे आणि नारायण कांबळे यांनी बैल खरेदीची कागदपत्रे दाखवली. मात्र तरीही या टोळक्याने हिवाळे यांना मारहाण केली, शिव्या दिल्या. व्यंकटेश भगत याने कॉलर खेचून मारले. अर्जुनसिंग याने जातीय उल्लेख करून अपमान केला. त्यानंतर शिवराज पिच्छाडे याने बैलाचे शेण आणून व्यंकटेश भगत याच्या हातात दिले. व्यंकटेशने परमेश्वर हिवाळे यांच्या, तर अर्जुनसिंग याने सम्मेकच्या तोंडात शेण कोंबले. रितेश देशमुख याने या सर्व घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडीओ केला. हा सारा प्रकार सुरू असताना हिवाळे यांनी विरोध करून मुलाला त्यांच्यापासून दूर केले. यश सरकटे आणि सोमेश पाटील या दोघांनी नारायण कांबळे यांना बेदम मारहाण केली.
पोलिसांनी बैल ताब्यात घेतला
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परमेश्वर हिवाळे, त्यांचा मुलगा तसेच नारायण कांबळे यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. खरेदीची सर्व कागदपत्रे दाखवूनही पोलिसांनी बैल ताब्यात घेतला. यावेळी पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांचे टोळके आले होते. परमेश्वर हिवाळे यांनी भीतीपोटी या प्रकरणी कोणतीही तक्रार केली नाही.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार
२० ऑगस्ट रोजी रितेश देशमुख याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. परमेश्वर यांचा भाऊ संदीप याने त्यांना हा व्हिडीओ दाखवला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आपल्याला जबर मानसिक धक्का बसला. कुटुंब तसेच नातलगांनी धीर दिल्यामुळे आपण फिर्याद दिल्याचे परमेश्वर हिवाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून व्यंकटेश भगत, अर्जुनसिंग, रितेश देशमुख, शिवराज पिच्छाडे, यश सरकटे, सोमेश पाटील यांच्यासह इतर अज्ञातांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































