अजमेरच्या दर्शनासाठी निघाले, पण काळाने वाटेतच गाठले! स्विफ्ट डिझायरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 4 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजमेर येथे दर्शनासाठी निघालेल्या उमरखेड परिसरातील भाविकांच्या स्विफ्ट डिझायर कारचा पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य चार जण जखमी झाले. या भीषण अपघाताचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, अपघाताची दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, कार अजमेरच्या दिशेने जात असताना चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार थेट डिव्हायडरवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात सय्यद बाबू, सय्यद अक्रम, सय्यद तोहिद आणि कार चालक फरान शेख हे जखमी झाले आहेत. त्यापैकी गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या भीषण अपघाताचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरधाव कार अचानक डिव्हायडरवर आदळतानाची दृश्ये या फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. अदनान खान यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी उमरखेड आणि ढाणकी परिसरात पोहोचताच शोककळा पसरली. दर्शनासाठी निघालेले असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची शक्यता आहे.