
स्वयंपाकासाठी लागणाऱ्या नारळापासून साखर, तांदूळ, डाळी, कांदा व लसणाचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता रोजच्या वापरातील दुधालाही चांगलीच ‘उकळी’ आली आहे. आता १ लिटर सुट्या दुधासाठी तब्बल १०२ रुपये मोजावे लागणार आहेत. १ सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार असल्याचे ‘मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन’ने जाहीर केले आहे.
दुभत्या जनावरांच्या चाऱ्याच्या खर्चात वाढ झाल्यामुळे लिटरमागे ९ रुपयांची वाढ करत असल्याचे मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंह यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत म्हशीच्या १ लिटर दुधासाठी ९३ रुपये मोजावे लागत आहेत. नवीन दरानुसार १ सप्टेंबर ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ही दरवाढ लागू राहणार असल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्वयंपाकाच्या सर्वच वस्तू महागल्याने मध्यवर्गीयांसमोर ‘आता जगायचे तरी कसे?’, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
“भेसळ रोखल्याने निर्माण झालेल्या तुटवड्याचा गैरफायदा घेत खासगी डेअरींची मनमानी सुरू झाली आहे. ‘आरे’ किंवा ‘महानंदा’सारख्या सरकारी डेअरी पूर्ण क्षमतेने सुरू असत्या, तर ही मनमानी झाली नसती.”
— राम कदम (कार्याध्यक्ष, दूध वितरक सेना)
सणासुदीत खिशाला फटका
ऐन सणासुदीत साखर, ड्रायफ्रूट्स आणि दुधाचे दर वाढल्याने मिठाई व पेढ्यांचे दरही वाढले आहेत. दूध आणि साखरेपासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये किलोमागे तब्बल १००, २०० ते ३०० रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असणारी दरवाढ आणखी वाढल्याने ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीचे प्रमाण कमी केल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रतिलिटर 9 रुपयांची वाढ दूध महागण्याची कारणे
पशुखाद्याच्या दरात 25 टक्के वाढ, जनावरांच्या खरेदी किमतीत वाढ, शुद्ध दुधाची वाढती मागणी वाढली, इंधन दरवाढीने वाहतूक खर्च वाढ
कटिंग चहा महागणार
साखरेचे भाव दहा रुपयांनी वाढून 72 रुपयांवर पोहोचल्याने आधीच चहा महागला असताना आता दूधही महागल्याने कटिंग चहाची किमतीदेखील आणखी वाढणार आहेत. यामध्ये 10 रुपयांना मिळणारा चहा 15 रुपये झाला आहे, तर काही ठिकाणी कटिंगसाठी 20 रुपयेही घेतले जात आहेत.






























































