
अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाच्या नावाखाली म्हाडाकडून ३,४१० सभासद आणि १५ हजार रहिवाशांच्या कायदेशीर, न्याय्य हक्कांवर आणि आर्थिक सुरक्षिततेवर गदा आणली जात आहे. ‘अपरिवर्तनीय वैयक्तिक संमतीपत्राच्या’ मसुद्यावर सभासदांनी मांडलेले आक्षेप, सूचना व हरकती डावलून हा एकतर्फी मसुदा माथी मारून आमची घरे आणि भवितव्य धोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, असा रहिवाशांचा आरोप आहे. या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी रहिवाशांच्या वतीने उद्या, रविवारी सायंकाळी ६ वाजता काळाचौकी येथील समाज मंदिर हॉल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. म्हाडातर्फे ‘सी अँड डी’च्या (C&D) माध्यमातून पुनर्विकास करण्यात येणार आहे. “आम्ही सरकारला रीतसर पैसे भरून या घरांचे मालक झालो आहोत; तरीही हक्काचा कार्पेट एरिया, कॉर्पस फंड, घरभाडे आणि बँक गॅरंटी अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये रहिवाशांचे हक्क पद्धतशीरपणे डावलले जात आहेत,” असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
रहिवाशांच्या प्रमुख मागण्या:
-
पुनर्विकासाची संपूर्ण माहिती रहिवाशांसमोर पारदर्शकपणे मांडावी.
-
म्हाडाच्या मसुद्यातील जाचक अटी तत्काळ रद्द करून ‘आधी माहिती व अटी, त्यानंतरच कन्सेन्ट’ हे तत्त्व काटेकोरपणे पाळावे.
-
कार्पेट एरिया, कॉर्पस फंड आणि घरभाडे यात कोणतीही तडजोड केली जाऊ नये.
-
प्रकल्पाची कालमर्यादा, विकासकाच्या जबाबदाऱ्या व बँक गॅरंटी अत्यंत स्पष्ट असावी.





























































