
गुटखा व बंदी असलेल्या पानमसाल्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) या फर्मानाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
संघटित गुन्हेगारीविरोधातील या कारवाईला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. “सर्वच प्रकरणांत हा गुन्हा नोंदवला जाणार आहे; हे चुकीचे आहे. अशा प्रकारे सरसकट सर्व घटनांमध्ये ‘मकोका’ लावता येणार नाही,” असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकार व एफडीएला (FDA) या याचिकेवर आपले उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे तपास करू नये
‘मकोका’चा तपास एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे करू नये. पोलिसांनी विनंती केल्यास या तपासात त्यांना सहकार्य करावे. तसेच ‘मकोका’ची कारवाई नियमानुसारच व्हायला हवी, असेही न्यायालयाने बजावले आहे.






























































