
>> वर्णिका काकडे
चित्पावनी ही कोकणस्थ ब्राह्मण समाजाची पारंपरिक आणि चित्पावनी बोलीभाषा आहे. ही मराठी भाषेची एक वेगळी व गोड बोलीभाषा आहे. महाराष्ट्रात दैनंदिन व्यवहारातून ही भाषा जवळजवळ लुप्त पावलेली असली तरी अजूनही गोव्याच्या काही भागात आणि कर्नाटकातील काही भागात विशेषत कारवार, उडुपी भागात अजूनही काही कुटुंबांत बोलली जाते.
मराठीशी साध्यर्म असले तरी प्रमाण मराठीपेक्षा या भाषेची उच्चारशैली वेगळी आहे. ही भाषा हेल काढून आणि अनुनासिक स्वरांचा वापर करून बोलली जाते. तसेच या बोलीत मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांशी साधर्म्य दिसून येते. जुन्या प्राकृत भाषेतील अनेक अनुस्वारयुक्त व मूळ शब्द यात अद्याप टिकून आहेत.
जुन्या मध्यमकालीन महाराष्ट्रीय भाषेचे विकसीत रूप म्हणून चित्पावनी बोली विकसित झाली असावी. ही बोली मूलत: प्राकृत भाषेतून निर्माण झाली असून आजपर्यंत आपले जुने रूप राखून आहे, अस एक मत आहे. कोकणातील चित्पिवनीवर मराठी व मालवणीचा प्रभाव जाणवतो, पण कोकणात ही बोली लोप पावली आहे. या बोलीसाठी देवनागरी लिपीचा उपयोग करतात. गोव्यातील चित्पावनीवर पोर्तुगीज व कोकणीचा प्रभाव जाणवतो. इथेही देवनागरी लिपीचा उपयोग या बोलीसाठी करतात. उत्तर कर्नाटकात चित्पावनी वर कानडी भाषेचा प्रभाव आहे. इथे कन्नड लिपीचा उपयोग करतात तर दक्षिण कर्नाटकात चित्पावनीवर कानडी व तुळू भाषेचा प्रभाव आहे. तिथेही कन्नड लिपीचा उपयोग लिखाणासाठी करतात. यावरून चित्पावनी बोलीची व्यापकता दिसून येते.
कोकणातील चित्पावनी कालोत्घात लोप पावली आहे. तशी ती सर्वच प्रांतातून लोप पावू नये, टिकून रहावी म्हणून साहित्य निर्मिती होणे गरजेचे आहे. चित्पावनी बोलीत साहित्य निर्मिती झाली नसली तरी संशोधनात्मक मराठी पुस्तके आहेत. नारायण गोविंद चाफेकर यांनी समाज शास्त्राrय व इतिहासीक अभ्यास करून ‘चित्पावनी’ या नावाचे पुस्तक शके 1860 मध्ये प्रकाशित केले. तसेच इतिहासकार श्री राजावडे, इरावती कर्वे, लिंडा कोक्स या लेखक संशोधकांनीही चित्पावनीचा समाजशास्त्राrय अभ्यास केला आहे परंतु त्यांची पुस्तके प्रकाशित झाली नाहीत.
चित्पावनी बोलीवर डॉ. सौ वसुधा भिडे यांनी पुणे विद्यापीठातून 1983 मध्ये पीएचडी केली आहे. तरअशोक नेने व श्रीधर बर्वे सारख्या लेखकांनी चित्पावनी भाषेत पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत.



























































