
नेपाळमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या आपत्तीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून रस्ते, पूल, घरे, वाहून गेली आहेत. या प्रलयामध्ये आतापर्यंत 579 नागरिकांचा मृत्यू झाला असून 1900 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. त्यात हिंदुस्थानच्या 320 नागरिकांचाही समावेश असून मुंबईच्या अंधेरी भागातील एक डॉक्टर दंपती नेपाळमधील मानसरोवर यात्रेदरम्यान बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मिलिंद चितळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. जानवी चितळे अशी या बेपत्ता दंपतीची नावे असून, नेपाळमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर कुटुंबाचा त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. डॉ. मिलिंद चितळे यांचे अंधेरी पूर्वमधील एमआयडीसी परिसरातील मळपा डोंगरी येथे क्लिनिक आहे. नेपाळ प्रवासाला निघण्यापूर्वी बाहेरील नोटीस बोर्डवर त्यांनी २४ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान मानसरोवर यात्रेनिमित्त क्लिनिक बंद राहील, अशी माहिती दिली होती. मात्र, ठरलेल्या मुदतीत आणि नेपाळमधील भीषण संकटानंतर संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत.
नेपाळमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामुळे नेपाळमधील रसुवा सह अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६२६ जणांचा मृत्यू झाला असून, अडीच हजारांहून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. या जलप्रलयात रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे डॉक्टर दंपतीच्या सुरक्षेबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, त्रस्त कुटुंबाने महाराष्ट्र शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून डॉ. मिलिंद आणि डॉ. जानवी चितळे यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना सुखरूप हिंदुस्थानात परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे भावूक आवाहन केले आहे.

























































