‘डिजिटल अरेस्ट’ दाखवून वृद्धाला घरात कोंडले, सायबर चोरट्यांची व्हीडीओ कॉलवरून नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

62 वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून सायबर टोळीने तब्बल 13 लाख रुपयांना लुटल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. आरोपींनी तब्बल आठ दिवस या वृद्धाला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. इतकेच नाहीतर त्यांच्यावर व्हीडीओ कॉलद्वारे नजर ठेवली. मात्र पत्नीला संशय आल्याने या प्रकरणाचा भंडाफोड झाला असून खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

नवीन पनवेल येथे राहणाऱ्या संबंधित वृद्धाशी एका सायबर ठगाने संपर्क साधला. त्याने स्वतःची ओळख ‘भारतीय डेटा सेंटर’चा पोलीस अधिकारी रोहित कुमार असे असल्याची करून दिली. वृद्धाच्या नावाने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) कॅनरा बँकेत बनावट खाते उघडल्याचा तसेच त्यांच्या नावावरील सिमकार्डचा गुन्ह्यात गैरवापर झाल्याचा दावा आरोपीने केला. यानंतर टोळीतील आरोपींनी पोलीस गणवेषात व्हॉट्सॲप व्हीडीओ कॉल केला. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगत वृद्धाला कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी देत एका खोलीत स्वतःला बंदिस्त करून घेण्यास भाग पाडले.

दोन एफडी मोडण्यास भाग पाडले

वृद्धावर सतत व्हीडीओ कॉलद्वारे नजर ठेवण्यात आली. या प्रकरणातून सुटका करून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी सर्वोच्च न्यायालय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नावाचा धाक दाखवला. त्यानंतर वृद्धाकडून बँकेतील 8 लाख आणि 5 लाख रुपयांच्या मुदत ठेवी मोडून घेण्यात आल्या. आरोपींनी वृद्धाला एकूण 13 लाख रुपये जळगाव येथील आयसीआयसीआय बँकेतील ‘ग्लोबल केमोटेक’ नावाच्या चालू खात्यावर वर्ग करण्यास भाग पाडले. दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हीडीओ कॉल करून घरातील सोने आणि अन्य बँक खात्यांमध्ये असलेल्या पैशांची माहिती मागण्यात आली. मात्र याबाबत संशय येताच वृद्धाच्या पत्नीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.