
मराठी न बोलणाऱ्या अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर परिवहन विभागाने सुरू केलेली कारवाई मराठी शिकवणीच्या नावाखाली एक वर्षे पुढे ढकलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मराठी एकीकरण समितीने हुतात्मा चौकात निषेध केला. हुतात्म्यांनो, मराठीद्रोही मुख्यमंत्री फडणवीसांना माफ करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
मराठी एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वतीने हुतात्म्यांची माफी मागितली. राज्याला मराठी भाषेच्या विरोधातले महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्री मिळाले आहेत, ज्यांनी मराठी भाषा धोरणाविरोधात जाऊन अनेक वेळा निर्णय घेतले आहेत, असा आरोप या वेळी समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला.
महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी बोलता आलेच पाहिजे असा कायदा 1989 पासून अस्तित्वात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याला अनुसरूनच अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. मराठी शिकण्यास वेळ देऊनही अनेक चालक मराठी शिकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्धची कारवाई रास्त होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमराठी चालकांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली तसेच त्यादरम्यान त्यांच्यावर काहीच कारवाई होणार नाही असेही सांगितले. मराठी भाषेसाठी, मराठी मुलखासाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांचा हा अवमान आहे. त्यामुळे फडणवीस यांचा समितीच्या वतीने निषेध करतानाच त्यांना माफ करा अशी प्रार्थना हुतात्म्यांना केल्याचे देशमुख यांनी सांगितले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ‘महाराष्ट्र गीत’ गाऊन मराठीप्रति अभिमानही व्यक्त केला.




























































