विमानतळावर 10 कोटींचे सोने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूल गुप्तवार्ता संचनालयाने (डीआरआय) ने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून सोने तस्करीचा पर्दाफाश केला. डीआरआयने कारवाई करून 10.75 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. सोने तस्करीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये पाच हे ट्रान्झिट प्रवासी असून ते बांगलादेशचे रहिवासी आहेत. ही टोळी बँकॉक, दुबई आणि मालेदरम्यान मुंबईमार्गे प्रवास करून तस्करी करतात अशी माहिती तपासात समोर आली आहे.

विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घेतली आहे. डीआरआयच्या पथकाला नुकतीच एक माहिती मिळाली. त्यानंतर डीआरआयने ऑपरेशन मिडनाईट गोल्ड स्ट्राईक हे ऑपरेशन हाती घेतली. ऑपरेशनदरम्यान डीआरआयच्या विशेष पथकाने विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला अडवले. तो मेणाच्या स्वरूपातील पूड असलेल्या सात कॅप्सूल घेऊन विमानतळाबाहेर पडत होता. त्याला डीआरआयने ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली. या तस्करीमध्ये आणि विमानतळावरून सोने चोरून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत काही ट्रान्झिट प्रवाशांचादेखील समावेश होता. डीआरआयच्या अधिकाऱ्याने या टोळीतील इतर सदस्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी सोन्याच्या कॅप्सूल हस्तगत केल्या. डीआरआरने या ऑपरेशनदरम्यान 16 कॅप्सूल जप्त केल्या. त्यात 6. 859 किलो वजनाची 24 कॅरेट सोन्याची पूड (मेणाच्या स्वरूपात) होती. त्या जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 10. 75 कोटी रुपये आहे. सीमा शुल्क कायद्यानुसार त्यांचा जबाब नोंदवून सहा जणांना अटक केली.