चोरलेल्या नव्या मोटरसायकल भंगारात विकल्या, सुट्या भागांसह चार जणांच्या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यावर उभे राहून तासन्तास ‘रेकी’ करायची व जादा काळ पार्क केलेल्या नव्या कोऱ्या मोटरसायकल पळवून त्या क्रॅप करणाऱ्या भंगारवाल्याला विकायच्या, अशी कार्यपद्धती असलेल्या चार जणांच्या एका टोळीला दहिसर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून आठ मोटरसायकल व मोडून टाकलेल्या 24 मोटरसायकलचे चेसीस इंजिन, नंबर प्लेट्स आदी सुटे भाग जप्त केले आहेत.

रोनीत भास्कर शेट्टी (23), पंकज मंगलप्रसाद गुप्ता (20), आशुतोष संतोष दुबे (20), पिंटू छोटेलाल गुप्ता (29) व एक 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी दहिसर पूर्व येथील केतकीपाडा, धारखाडी रोड, आनंदनगर आदी भागांत राहणारे आहेत.

मोटरसायकल चोरून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, उपायुक्त गजानन राजमाने, एसीपी जयराज रणवरे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व त्यांचे सहकारी मारुती सांगळे, हेमंत गिते तसेच पोलीस हवालदार अमोल जाधव, अमित पाटील, शाहनवाज सय्यद, सुशांत जाधव, कपिल चौधरी, महेंद्र महाले, ओमकार राणे, सागर पवार आदी पोलीस पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन आरोपींना अटक केली व चोरीला गेलेल्या चार मोटरसायकल आणि 24 मोटरसायकलचे सुटे भाग जप्त केले. दहिसर, बोरिवलीचे एमएचबी, मालवणी आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची अटकेत असलेल्या आरोपींनी कबुली दिली आहे.

चोरीच्या पैशांतून मौजमजा

मोटरसायकल चोरून त्या भंगारवाल्याला विकणे व त्यातून मिळालेल्या पैशांतून मौजमजा करणे हा या आरोपींचा रोजचा धंदा आहे. चोरलेल्या गाडय़ांचे सुटे भाग विकून मालमाल झालेल्या पिंटू छोटेलाल गुप्ता यालाही पोलिसांनी अटक केली असून या संघटित टोळीविरुद्ध ‘मोक्का’ची कारवाई करावी अशी मागणी ज्या तरुणांच्या मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत अशा तरुणांनी केली आहे.