
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी लखनौमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशातील सध्याचे सरकार हे आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विरोधकांना बदनाम करण्यासाठी सरकार एआय तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे व्हिडीओ व्हायरल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारने असे बालिश खेळ खेळू नयेत, कारण एआय तंत्रज्ञानात आम्ही त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहोत, असा इशाराही यादव यांनी दिला. यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री योगी यांच्याबाबतचा एक एआय व्हिडीओही दाखवण्यात आला, ज्यामध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
याशिवाय राज्यात मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. सरकार सध्या शाळा बंद पाडत असून, याच बंद पडलेल्या शाळांमध्ये जाऊन आम्ही कार्यक्रम घेऊ आणि सरकारचे सर्व कारनामे जनतेसमोर उघड करू, असेही ते म्हणाले. पायाभूत सुविधांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, कानपूर-लखनौ एक्सप्रेस वे आणि अगदी पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या एक्सप्रेस वेवरही खड्डे पडले आहेत. डिझाईनमध्ये त्रुटी असल्याचे कारण आता दिले जात आहे. प्रयागराज कुंभमेळ्यापासून आतापर्यंत एक लाख कोटींहून अधिक खर्च होऊनही कोणताही ठोस विकास झालेला नाही, असे सांगत त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर ताशेरे ओढले.


























































