उत्तराखंडमध्ये पावसाचं तांडव… घरावर दरड कोसळली; गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आईसह दोन लेकरांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये पावसाचे तांडव सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आणखी जोर पकडला असून अल्मोडा जिल्ह्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. हवालबाग भागातील उदयुडा गावात मंगळवारी पहाटे मुसळधार पावसामुळे एका घरावर दरड कोसळली. या ढिगाऱ्याखाली दबून आई, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला. प्रेमा देवी (वय – 41), मनीष (17) आणि कल्पना (वय – 19) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्मोडा परिसरात सोमवार रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत असताना डोंगरावरून अचानक मोठा ढिगारा, दगड आणि माती थेट घरावर कोसळली. पावसामुळे घराची भिंत ढासळली आणि तीनही सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले. मोठा आवाज आणि किंचाळ्या ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य सुरू केले. मात्र, प्रचंड ढिगारा बाजूला करून तिघांना बाहेर काढेपर्यंत खूप उशीर झाला होता. ढिगाऱ्याखाली दबून तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उत्तराखंडमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. डेहराडून येथील डालनवाला परिसरातील मोहिणी रोड पुलाजवळ रात्री 1 च्या सुमारास रिस्पना नदीची पाणी पातळी अचानक वाढली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून संवेदनशील भागांत सातत्याने गस्त घातली जात आहे.

वाहतूक ठप्प

मसूरी-डेहराडून मार्गावर पाणी वाला बँड आणि गालोगी धार येथे दरड कोसळल्याने तसेच झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने ढिगारा हटवून मार्ग मोकळा केला आहे. उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्ग ‘राणाचट्टी’जवळ, तर बागेश्वरमधील गरूड-बागेश्वर मार्ग ‘रवाईखाल’जवळ दरड कोसळल्याने बंद झाला होता. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून डेहराडून आणि पिथोरागढ जिल्ह्यांमधील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.