
आगामी गणेशोत्सव संपूर्ण मुंबईत उत्साहात आणि निर्विघ्नपणे साजरा व्हावा यासाठी मुंबई पालिका आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची संयुक्त बैठक आज पार पडली. या बैठकीत आगमन-विसर्जनातील अडथळे, रस्ते-पुलांची दुरुस्ती, चौपाट्यांवरील प्रकाशव्यवस्था आणि भाविकांच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
काही ठिकाणी नव्याने झालेल्या काँक्रिटीकरण व डांबरीकरणामुळे रस्त्यांची पातळी वाढली असून श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये अडथळे येत आहेत. हे अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी बैठकीत केली. यावर महापौर रितू तावडे यांनी पालिका प्रशासनामार्फत विसर्जन स्थळे, महापालिकेच्या हद्दीतील पूल आणि मार्गांवरील खड्डय़ांची विशेष पाहणी मोहीम राबवून दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.
विसर्जनाच्या ठिकाणी वापरात येणाऱ्या क्रेन व तराफ्यांसाठी काही ठिकाणी अनधिकृतपणे पैशांची मागणी केली जाते. पालिकेकडून ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्याने भाविक वा मंडळांकडून पैसे उकळले जाऊ नयेत यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
गणेशभक्तांची मोफत आरोग्य तपासणी
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महापौर वैद्यकीय निधीतून मुंबईत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली. तसेच या विशेष उपक्रमांतर्गत श्रीगणेश मंडळांच्या सभामंडपात श्रीगणेशभक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
सहा फूट उंचीपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक असून त्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक व्यवस्था केली आहे.
1 सप्टेंबर 2026 पर्यंत 1 हजार 885 सार्वजनिक श्रीगणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांची पोलीस आणि महानगरपालिका स्तरावर छाननी सुरू आहे.
गणरायाच्या आगमन व विसर्जन मार्गावरील एकूण 506 रस्त्यांवरील 4 हजार 279 खड्डे आणि 171 ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती केली आहे.
























































