
मोदी सरकारची चालबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. हिंदुस्थानचा आर्थिक विकास दर 7.8 टक्क्यांनी वाढल्याच्या सरकारच्या दाव्याची माजी केंद्रीय वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी पोलखोल केली आहे. ‘देशाची जीडीपी वाढ 7.8 टक्के नव्हे, तर फक्त 2.6 टक्के आहे,’ असा दावा गर्ग यांनी केला आहे.
जीडीपी वाढीच्या नव्या आकडेवारीवर देशातील उद्योग व आर्थिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनी देशातील सद्यस्थितीचे दाखले देत सरकारच्या आकडय़ांवर संशय व्यक्त केला आहे. या संशयाला बळ देणारे परखड विश्लेषण सुभाष गर्ग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘जीडीपी वाढीचा 7.8 टक्के हा दर वरकरणी खूपच आकर्षक वाटतो. मात्र, वास्तव समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. मागील वर्षीच्या पहिल्या आर्थिक तिमाहीतील जीडीपी वाढदेखील 7.8 टक्के होती. मात्र, त्यात फेरबदल करून ती 6.9 टक्क्यांवर आणली गेली. त्यामुळे यावेळी आर्थिक विकास दर वाढलेला दिसतो. प्रत्यक्षात मागील वर्षीच्या 7.8 टक्क्यांशी तुलना केल्यास यावेळचा वाढीचा दर फक्त 2.6 टक्के आहे, असे गर्ग म्हणाले.
अर्थतज्ञ रघुराम राजन यांचेही प्रश्न
देश इतक्या वेगाने प्रगती करत असेल तर नवे रोजगार का निर्माण होत नाहीत?
देशात विदेशी गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर का येत नाही?
उद्योजक भांडवली गुंतवणूक करण्यास का कचरत आहेत?
काँग्रेसचा हल्ला
सुभाष गर्ग आणि राजन यांच्या टीकेनंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘अर्थव्यवस्था मजबूत व्हावी अशी आमची सगळय़ांची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी खोटय़ा आकडेवारीचा आधार घेतला जाऊ नये. सरकारने वास्तव स्वीकारून सुधारणेचा मार्ग धरावा. पीआर करून फक्त जीडीपी आकडे वाढवले जाऊ शकतात, अर्थव्यवस्था मजबूत होत नाही हे मोदी सरकारने लक्षात ठेवावे,’ अशी खोचक टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली.
मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत हा जीडीपी 86 लाख कोटी रुपये होता. त्यात बदल करून तो 80 लाख कोटी रुपयांवर आणला गेला. या बदलामुळे आताचा जीडीपी दर वाढलेला दिसत आहे. जीडीपी वाढलेला दिसावा यासाठीच आकडय़ांमध्ये हे बदल करण्यात आले.




























































