
मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे. आम्ही सांगितले सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी करा. पण यांना आंदोलन मोडून काढायचे आहे. तुम्हाला दंगली घडवायच्या आहेत का, असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. ‘काम कमी करायचे आणि दुसऱ्या जातींना डाग लावायचा. नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहिजे असे यांचे धोरण आहे’, अशा शब्दांत जरांगे यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून महायुती सरकारवर हल्ला चढवला.
अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सोडवण्यासाठी आणि आरक्षणाच्या मुद्दय़ावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रसाद लाड यांनी आज अंतरवाली सराटी येथे जरांगे यांची भेट घेऊन सर्व मागण्यांवर येत्या पंधरा दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन देत उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यावर जरांगे यांनी आणखी चार दिवस घ्या, पण सगळ्या मान्य होईपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
बहुतेक यांच्या डोक्यात वेगळेच काहूर आहे. यांना आमचा एक माणूस मारला की आम्ही यांचा एक माणूस मारणार, याचे मोठे षड्यंत्र आहे. आमच्या जातीचे असूनही तुम्ही नीच आहात. आपण कुणालाही हात लावायचा नाही. यांना फक्त हात लावू द्या. यांच्या डोक्यात दंगल घडवायची असेल तर मी उपोषण सोडून देईन आणि टप्पू गोटे घेऊन व्यासपीठावर बसेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
जरांगेंच्या प्रमुख मागण्या
रद्द केलेले 4 जात प्रमाणपत्र वैध करा, तातडीने 58 लाख नोंदीचे जात प्रमाणपत्र वाटप सुरू करा, सातारा, कोल्हापूर संस्थांचे जीआर काढा, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करा, ईसीबीसीमधून निवड झालेल्या झालेल्या मुलांना नियुक्त्या द्या, असे जरांगे म्हणाले.
तुम्हाला तेच भांडण लावायचंय
मंडल आयोगात मराठा समाजाचा अंतर्भाव केला असता तर हा इतिहास घडला नसता. 1994 सालच्या मुख्यमंत्र्यांचे हे पाप आहे, असे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यावर जरांगे यांनी आता तू शिफारस कर, तू मराठय़ाचा देव, लोकाकडे कशाला बोट दाखवतो. तुम्हाला तेच भांडण लावायचं आहे. तुम्हाला आमचे वाटोळे करायचे का, असा सवाल करत जरांगे यांनी विखे-पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.
मध्यस्थी लाडांनी दिली ही आश्वासने
उद्या दुपारी 12 वाजल्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
ज्या चार विद्यार्थ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाली त्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल.
मराठा आरक्षणाच्या लढय़ादरम्यान दाखल एकूण 1376 गुह्यांपैकी बहुतांश गुन्हे मागे घेण्यात आले असून तांत्रिक व कायदेशीर चौकटीतील गुन्हे कसे मागे घेता येतील, याची पडताळणी सुरू आहे.
मराठा आरक्षणाच्या समितीसाठी 1250 स्क्वेअर फुटाचे स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून दिले जात आहे.
यापुढे थेट मंत्रालयाशी समन्वय साधून मराठय़ांचे सर्व प्रश्न वेगाने सोडवले जातील.
जात पडताळणी समिती आणि वंशावळी शोधणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल. समितीच्या कामकाजासाठी मुंबईत तीन हजार स्क्वेअर फुटांची जागा दिली जाईल.
ओबीसींना दिल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक व आर्थिक सवलती मराठा समाजालाही पूर्णपणे लागू करण्यात येतील.
आरक्षणाचा अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणत्याही मराठा विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवेश रद्द केला जाणार नाही. शैक्षणिक शुल्काचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी 300 कोटी रुपयांचा निधी तत्काळ वितरित केला जाईल.
मराठा तरुण रस्त्यावर
मनोज जरांगे यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा बांधव आक्रमक झाले असून तरुणांनी गावागावांत आंदोलने सुरू केली आहेत. बीड, जालना येथील तरुणांनी उपोषण सोडण्यासाठी सरकार पुढाकार घेत नसल्याचा आरोप करत रस्त्यावर उतरून निदर्शने केली. उपोषण स्थळीदेखील लोकांचे लोंढे सतत दाखल होत आहेत. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहचण्याची तयारी सुरू केली आहे.
पाच जिल्हय़ांत आज बंद
जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना, बीड, परभणी, लातूर आणि धाराशीव या पाच जिह्यांत मराठा समाजाकडून 3 सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारच्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेत मराठवाडय़ातील अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला.
धुळे-सोलापूर मार्गावर ठिय्या
मनोज जरांगे यांची पाचव्या दिवशी तब्येत खालावल्याने आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केला. रास्ता रोकोदरम्यान आंदोलकांनी हलगी वाजवत घोषणाबाजी केली. हलगीच्या तालावर काही आंदोलक नाचताना दिसून आले. ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘लडेंगे, जितेंगे, हम सब जरांगे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आजपासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप, सरकारचे आश्वासन पण जरांगे उपोषणावर ठाम
जरांगे यांनी अधिकाऱ्यांचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर सरकारकडून मध्यस्थीसाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांना अंतरवली सराटी येथे पाठवण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारला मान्य आहेत. उद्यापासून 3 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्राचे वाटप सुरू होईल. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या म्हणजे 17 सप्टेंबरच्या आधी पूर्ण करू, मराठय़ांना ओबीसींच्या सर्व सवलती देऊ, असा शब्द सरकारच्यावतीने लाड यांनी दिला आणि जरांगे यांना उषोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगे यांनी घोटभर पाणी घेतले. ‘पाणी पितो, सलाईन लावतो, पण उपोषण पूर्णपणे सोडणार नाही आणि प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही’, असे त्यांनी ठणकावले.
तुम्ही माणसं बेशुद्ध पडल्यानंतर येणार आणि वाचला का विचारणार. नीच अवलादी आहेत. मराठे चवताळले तर तुम्हाला हाताखालून काढतील. मुंबईतही हेच होईल. इकडे मरण्यापेक्षा तिथे जातीसाठी मरून शहीद होऊ. जातीसाठी मरायचं नाही तर मग दारू पिऊन मरायचं का? आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास आम्हीसुद्धा काठीच्या बदल्यात काठी घेणार.

























































