राहुल गांधींच्या इंदूर येथील ‘छात्रों की गूंज’ची जबाबदारी असलेल्या काँग्रेसच्या माजी आमदाराच्या घरावर ईडीची छापेमारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंदूर येथे होणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची जबाबदारी असलेले माजी आमदार संजय शर्मा यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुलीच्या विविध प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

नरसिंहपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुलीत घोटाळा झाल्याचा ईडीचा संशय आहे. या मार्गावरील टोल वसुलीचे काम संजय शर्मा यांच्या कंपनीकडे होते. येथील टोलनाक्यावर बेकायदा सॉफ्टवेअरचा वापर करून बनावट पावत्या बनवल्या जात होत्या. या माध्यमातून गोळा केलेले पैसे इतरत्र वळवण्यात आले होते. फॉरेन्सिक तपास आणि एनएचएआयच्या नोंदींच्या चौकशीतून हा घोळ समोर आला. त्या आधारे ईडीने आज शर्मा यांच्याशी संबंधित विविध कार्यालयांवर छापे टाकले. त्याशिवाय महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू, कोलकाता आणि दिल्लीतही तपास सुरू करण्यात आला आहे.

कार्यक्रम लांबणीवर

राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. इंदूरमध्ये हा कार्यक्रम 12 सप्टेंबरला होणार होता तो आता 19 सप्टेंबरला होणार आहे.

‘काँग्रेसवर कारवाई करणाऱ्या ईडीला नर्मदेत बेकायदा उत्खनन करणारे आणि शिक्षण, आरोग्याला धंदा बनवून कोटय़वधीची माया जमवणारे सत्ताधारी नेते दिसत नाहीत का?’  – रोहित पटेल, काँग्रेस नेते

सरकारच्या इशाऱ्याने कारवाई

कारवाईचा काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला. ‘सरकारच्या इशाऱ्यावर ईडी काम करत आहे. सरकार संजय शर्मा यांचा आवाज दाबू शकत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता शर्मा यांच्यासोबत जनतेचे प्रश्न मांडत राहील,’ असे काँग्रेसने ठणकावले.