
सततच्या क्रिकेटमुळे हिंदुस्थानी खेळाडूंवरील दुखापतींचे संकट वाढत असल्याची कबुली बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिली. सामन्यांचा वाढता ताण कमी करण्यासाठी आगामी फ्युचर टूर्स प्रोग्राममध्ये (एफटीपी) आवश्यक बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी हिंदुस्थानी खेळाडूंनी दोन महिने आयपीएल खेळली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 15 पैकी तीन ते चार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले. जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांना दुखापतींचा फटका बसला. हिंदुस्थानला इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका गमवावी लागली. त्याआधी आयर्लंडविरुद्धही पराभव झाला.
मुंबईत बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, टी-20 कर्णधार श्रेयस अय्यर आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल यांच्यासोबत बैठक घेतली. खेळाडूंना पुरेसा आराम, वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ आणि सराव सामने मिळतील, अशा पद्धतीने आगामी वेळापत्रक आखण्यावर चर्चा झाली.
दरम्यान, आयर्लंड आणि इंग्लंडमधील अपयशाचे आत्मपरीक्षण करून 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघसंयोजन तयार करण्याचा बीसीसीआयचा निर्धार आहे.



























































