
मराठवाड्याच्या विकासाच्या शेकड्यांनी घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात किती उतरल्या? मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 46 हजार कोटी रुपयांच्या योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र मराठवाड्याच्या पदरी पडले फक्त 3 हजार कोटी! तेही तसेच पडून आहेत. मराठवाड्याच्या विकासाची श्वेतपत्रिकाच काढा म्हणजे काय मिळाले हे लोकांसमोर येईल, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. ‘वंदे मातरम्’ची किती कडवी गायला पाहिजेत यावर बोलण्यापेक्षा त्यातील सुजलाम् सुफलाम् हे शब्द आपण किती प्रत्यक्षात आणले आहेत याचा विचार करायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडणारा ‘विकासाला विलंब म्हणजे विकासाला नकार’ या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. राज्यात वेगवेगळ्या विषयांवर आंदोलने होत आहेत, पण शाश्वत विकासावर कोणीही बोलत नाही. राज्याला पुढे कसे न्यायचे याचे धोरण कुणीही सांगत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वयाचा पूल असला पाहिजे. पण आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा असे सध्या सत्ताधाऱ्यांचे धोरण दिसते, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, कैलास पाटील, प्रवीण स्वामी, उपनेते सुभाष पाटील, उद्योजक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
80 कोटी बेरोजगार जाणार तरी कुठे?
अजय बंगा हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते पुढच्या दहा वर्षांत 120 कोटी तरुण जागतिक जॉब मार्केटमध्ये येणार आहेत आणि रोजगार निर्मिती होणार आहे फक्त 40 कोटी! उरलेले 80 कोटी बेरोजगार कुठे जाणार?






























































